अर्थसंकल्प ट्विट प्रकरणाची चौकशी करा; विरोधक आक्रमक विधानभवनासमोर घोषणाबाजी

Foto

मुंबई:  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दुपारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यातील मुद्दे सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात येत होते. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घालत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फोडला असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर आज (बुधवारी) विरोधकांनी याचा निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली.

राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच तो फोडला असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार घोषबाजी केली. तसेच अर्थसंकल्प सादर होत असताना त्याची ट्विटरवर माहिती देण्यात येत होती, याची सायबर सेलमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच त्याची माहिती बाहेर आली होती का? असा सवाल करत अर्थसंकल्प फुटणे ही काही साधी बाब नाही. याची माहिती बाहेर कशी गेली?, अर्थसंकल्प सादर होत असताना ट्विट कसे होत गेले?, यातून कोणाला फायदा करून देण्याचा उद्देश होता का? असे सवाल जयंत पाटील यांनी केले. तसेच विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीदेखील याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. परंतु त्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मी तपासून पाहिले. ट्विटरवर आलेले सर्व ट्विट हे भाषणाआधी आलेले नाहीत. त्यात 15 मिनिटांचे अंतर आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावेळी पीएमच्या ट्विटमध्ये फक्त 2 ते 3 मिनिटांचे अंतर असते. त्याची लाईव्ह बातमीही सुरु असते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतं. विरोधी पक्षांनी ही माध्यमे समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात, पण आम्ही सकारात्मक वापर करत आहेत यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये, असेही म्हटले होते..

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker